साडेआठ कोटीपेक्षा अधिक रक्कम खात्यात जमा होणार
रत्नागिरी:- अवकाळी पावसामुळे २०१५ मध्ये जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. तेव्हाची तीन महिन्याची व्याजमाफी आणि पुनर्गठीत कर्जावरील व्याज अशी ८.५० कोटींपेक्षा जास्त रक्कम आंबा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. याचा फायदा १२ हजार ५१३ बागायदारांना होणार आहे.
आंबा, काजू उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंबा आणि काजू उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीत माहिती दिली. जानेवारी , फेब्रुवारी, मार्च २०१५ अशा तीन महिन्यात अवकाळी पावसामुळे नुकसानीसाठी आंबा शेतकऱ्यांना पिक कर्जावरील माफी जाहीर झाली होती. १२ हजार ५१३ कर्जदारांना ३ कोटी ३५ लाख ९३ हजार १७८ इतकी व्याज माफी आणि कर्जाचे पुनर्गठनापोटी ५ कोटी २६ लाख ५८ हजार ४३३ अशी व्याज रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. ही बाब शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात लगेच कार्यवाहीच्या सूचना वित्त विभागाला दिल्या. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदरांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील याविषयी सूचना केल्या. कृषिमंत्री धनंजय मुंडे, पणन मंत्री अब्दुल सत्तार, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे शिष्टमंडळ , वित्त, पणन, कृषी विभागाचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आंबा उत्पादन वाढीसाठी टास्क फोर्स
दापोली कृषी विद्यापीठाने दिलेल्या अहवालानुसार गेल्या हंगामात आंब्याचे उत्पादन केवळ १५ टक्के झाल्याचे नमूद केले आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून थ्रिप्स रोगामुळे आंब्याचे मोठे नुकसान होत आहे. अशा प्रकारे उत्पादकांना मोठा फटका बसतो. तसेच यावर गुजराण करणाऱ्या लाखो कुटुंबाना देखील ही झळ सोसावी लागते. ही गोष्ट लक्षात घेता कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तत्काळ एक टास्क फोर्स स्थापन करून त्यात कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी, तसेच प्रगत नामवंत प्रयोगशील शेतकरी, तज्ज्ञ यांचा समावेश करावा आणि त्यांची एक बैठक लगेच घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले.