यू विन ॲपद्वारे बालकांच्या लसीकरणाची होणार नोंदणी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हयातील एकही बालक लसीकरणाविना वंचित राहू नये, लसीकरणाअभावी बालकांचा मृत्यू टाळण्यासाठी आता आरोग्य विभागामार्फत यू विन ॲपचा वापर करत बालकांची लसीकरण नोंदणी केली जाणार आहे. या ऍपमुळे बालकांचे लसीकरण सोपे झाले आहे. 0 ते 18 वयोगटातील मुले तसेच गरोदर, स्तनदा मातांना देण्यात येणार्‍या लसीकरणाची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आता नवीन ॲपवर नोंद केल्यानंतर बालकाचे लसीकरण होणार आहे. या मोहिमेची पहिली फेरी 7 ते 12 ऑगस्टदरम्यान मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये होणार आहे. कोरोनामध्ये लसीकरणानंतर नागरिकांच्या मोबाइलवर संदेश प्राप्त होत होता. त्याच धर्तीवर आता आरोग्य बालकांच्या विविध प्रकारच्या लसीकरणातही लस मिळाल्यानंतरची नोंद मोबाइलवर यू विन पोर्टलद्वारे येईल, लसीकरणाशी संबंधित सर्व तपशिलांची नोंद पोर्टलवर केली जाईल. लाभार्थीस कोणत्याही राज्यात अथवा जिल्हयात लसीकरणाचा लाभ घेताना अडचण येणार नाही. या पोर्टलच्या माध्यमातून एका क्लिकवर लसीकरणाशी संबंधित माहिती मिळेल. त्यासाठी जिह्यातील संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.
शहरातील हद्दीमध्ये अति जोखमीच्या भागात विविध बालकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. तसेच स्थलांतरीत बालके याशिवाय रोजगारासाठी शहरी भागात दाखल होणार्‍या विविध कुटूंबातील मुलांचे लसीकरण वाढल्यास ही टक्केवारी अधिक होवू शकते. या ऍपमुळे लसीकरण मोहिम कुठे आणि कधी सुरु असेल याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे बालकांचे लसीकरण वेळेत होण्यास मदत होऊन बालके लसीकरणापासून वंचित राहणार नाही. यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ए. ए. आठल्ये व जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाल यांनी केले आहे.