कोकणातील पहिल्या डीआरटीबी केंद्रामुळे जिल्हा क्षयरोग मुक्तीकडे

रत्नागिरी:- कोकणातील पहिले डीआरटीबी केंद्र चिपळूण येथे सुरू झाल्यानंतर क्षयरोग रुग्णांना दिलासा मिळाला आहे. या केंद्रामुळे जिल्हा क्षयरोगमुक्त होण्यास मदत होणार असून सध्या या केंद्रात जिल्ह्यातील 65 रुग्णांवरत औषधोपचार सुरूआहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून वेगाने सुधारणा होत आहे.

खासगी व सरकारी भागीदारी शासन धोरणावर आधारित कोकणातील पहिले केंद्र वालावलकर हॉस्पिटल डेरवण, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथे आहे. हे केंद्र माहे डिसेंबर 2021 मध्ये सुरू  करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील डीआरटीबी केंद्रात माहे जानेवारी 2022 ते आजपर्यंत 65 रुग्णांवर औषधोपचार सुरू केले आहेत. सदरच्या डीआरटीबी केंद्रात रुग्णासाठी जेवण, राहण्याची सोय व औषधोपचार शासनामार्फत मोफत केले जातात. या डीआरटीबी केंद्राआधी डीआरटीबीची औषधे रुग्णास सुरू करण्यासाठी मुंबई येथे जावे लागत होते.  त्यामुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक यांना आर्थिक ताण येत होता.  तसेच पुढील औषधोपचार सुरू होण्यास विलंब होत होता, ही गैरसोय आता दूर झाल्याचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी सांगितले.
क्षयरोगाचा रुग्ण जेव्हा खोकतो, शिंकतो त्यावेळी क्षयरोगाचे जंतु वातावरणात पसरतात. श्वासावाटे ते निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर सर्वच माणसांना क्षयरोग होईल असे नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा माणसांना नंतर क्षयरोगची लक्षणे दिसतात. एक क्षयरोगी वर्षभरात 10 ते 15 माणसांना हा आजार पसरवू शकतो. आजार होण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.
तो मुख्यत्वे करून फुफ्फुसाचा आजार आहे. शरीराच्या इतर अवयवांनाही तो होऊ शकतो उदा. मज्जासंस्था, रक्ताभिसरण संस्था, त्वचा, हाडे इत्यादी. दोन आठवड्यांपेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट, थुंकीवाटे रक्त येणे अशा लक्षणांबाबत नागरिकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असेल तर तातडीने टीबीची तपासणी करणे आवश्यक आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये क्षयरोगाचे उपचारित रुग्ण 644, एमडीआर रुग्ण 164 असे एकूण 808 रुग्ण आहेत.
क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास तत्पर तपासणी करून औषधोपचार सुरू करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली काळजी घेऊन, सन 2025 पर्यंत क्षयरोगमुक्त भारत घडविण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.