रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील चवे फाटा येथील चिरेखाणीवर चिरे कापण्याचे मशीन अंगावर पडल्याने कामगाराचा पाय कापला गेला होता. जखमी कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू झाला.
रवी बापू जाधव (वय ३५, मूळ राहणार दुधनी,अक्कलकोट) असे मृत कामगाराचे नाव आहे. रत्नागिरी तालुक्यातील चवे फाटा गावातील चिरेखाणीवर विनोद शिंदे हे मशिनऑपरेटर म्हणून काम करीत होते. कामाचे दरम्यान त्यांना फोन आला म्हणून त्यांनी चिरे खाणींची मशिन बंद करून फोन घेतला. फोनवर बोलत असतानाच त्याठिकाणी चिरेखाणीवर काम करीत असलेल्या रवी जाधव हा कामगार आला. त्याने सदरची बंद केलेले मशीन चालू केले. रवी याला मशीन चालवता येत नसल्याने मशिन उडाले. त्याबरोबर रवी देखील उडाला व मशीनवर जाऊन पडला. त्यावेळी मशीनच्या ब्लेडवर त्याचा पाय कापला गेला. इतर कामगारांनी त्याला तातडीने शासकीय रूग्णालयात दाखल केले तेथे त्यांचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.