रत्नागिरी, सिंधुदुर्गातील ६२ व्यापाऱ्यांवर खटले

वैधमापन शास्त्रची कारवाई ; १०७ टक्के महसुली उद्दिष्ट पूर्ण  

रत्नागिरी:- वजनकाटा, इलेक्ट्रिक काटा, मापन आदींमध्ये घोळ घालणाऱ्या आणि इलेक्ट्रॉनिक व अन्य पॅकबंद वस्तूंवर उत्पादनाची इत्थंभूत माहिती, नेमकी किंमत दर्शवणारे स्टीकर किंवा लेबल न लावणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील ६२ व्यापाऱ्यांवर खटले भरण्यात आले; मात्र तडजोड शुल्क घेऊन ते मिटवण्यात आले. येथील सहाय्यक नियंत्रण वैधमापन शास्त्र विभागाने ही कारवाई केली आहे तसेच परवाना नूतनीकरणाच्या माध्यमातून या विभागाने उद्दिष्टापेक्षा जास्त महसूल गोळा केला आहे. विभागाला १ कोटी ११ लाखाचे उद्दिष्ट होते. पैकी १ कोटी १८ लाख ८६ हजार म्हणजे १०७ टक्के जादा महसूल जमा केला आहे.

सहाय्यक नियंत्रण वैधमापन शास्त्र विभागाकडून दरवर्षी वजनकाटे, इलेक्ट्रिक काटे, मापन आदींची तपासणी होते. त्यासाठी जास्तीत जास्त पाच हजारापर्यंत शुल्क आकारून परवान्याचे नूतनीकरण होते; मात्र काही वजनमाप धारकांनी परवाना नूतनीकरणामध्ये विलंब करणे तसेच त्यामध्ये काहीतरी छेडखानी केल्याचे तपासात उघड झाले आहे. गेल्या एप्रिल २०२१ ते आजपर्यंत केलेल्या तपासणीमध्ये दोन्ही जिल्ह्यातील ६२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तीन वर्षांमध्ये अशाच प्रकारचा गुन्हा घडल्यास संबंधितावर खटला दाखल केला जातो तर काहींना नोटीस देऊन त्यांच्याकडून तडजोड शुल्क घेऊन खटले मिटवण्यात येतात.  आतापर्यंत ६२ खटल्यांमध्ये ६० हजार ५०० तडजोड शुल्क घेऊन खटले मिटवण्यात आले. यामध्ये रत्नागिरी ४ खटले, राजापूर २, संगमेश्वर २, चिपळूण ८, दापोली ७, कणकवली ९, मालवण ५, सावंतवाडी २ असे ३९ व  इतर २३ असे एकूण ६२ खटले मिटवण्यात आले.  वैधमापन शास्त्र विभागाला या आर्थिक वर्षाला १ कोटी ११ लाखाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परवाना नुतनीकरण्याच्या माध्यमातून या विभागाने त्यापैकी १ कोटी १८ लाख ८६ हजार एवढे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.

एमआरपीपेक्षा जास्त किमतीचे स्टीकर लावल्यास बेकायदेशीर

कोणत्याही दुकानातील पॅकबंद वस्तू घेताना त्यावर संबंधित कंपनीचे लेबल हवे. यामध्ये कोणते उत्पादन आहे, कधी पॅकिंग केले, त्याची किंमत, वजन, संख्या आदी माहिती आवश्यक आहे तसेच स्टीकर लावले तरी वरील सर्व माहिती आवश्यक आहे. कोणत्याही पॅकबंद वस्तूला एमआरपीपेक्षा कमी कमितीचे स्टीकर लावण्याची परवानगी आहे; मात्र एमआरपीपेक्षा जास्त किंमत दाखवणारे स्टीकर लावल्यास ते बेकायदेशीर आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.