प्रियकराचा लग्नास नकार; तरुणीची पेटवून घेत आत्महत्या

लांजा:- येथे मामाच्या घरी राहण्यासाठी आलेल्या मुलीने प्रेमप्रकरणातून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेत आत्महत्या केली. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्ता राजेश कोतापकर (16, रा. वरळी मुंबई) हिचे शेजारी राहणार्‍या योगेश जाधव (21) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले होते. युक्ता ही 4 जानेवारी रोजी लांजा वाकेड येथील मामाच्या घरी राहण्यासाठी आली होती. मुंबई येथे राहणार्‍या प्रियकराबरोबर तिचे बोलणे चालू असायचे. मात्र एकदिवस तिने प्रियकराला लग्नाविषयी विचारले. मात्र प्रियकराने लग्नास नकार दिल्याने युक्ता हिने टोकाचे पाऊल उचलले. 27 जानेवारी रोजी तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. नातेवाईकांनी तिला प्राथमिक उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तब्येत अधिकच बिघडल्याने मुंबई येथील के.ई.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद वडिल राजेश कोतापकर (47, वरळी, मुंबई) यांनी दाखल केली.