बचत गटांसाठी को ऑपरेटीव्ह सोसायटी स्थापन करणार: डॉ. इंदूराणी जाखड

रत्नागिरी:- महिला बचत गटांनी बनविलेल्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तामिळनाडू, कर्नाटकच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यात बचत गटांची को ऑपरेटीव्ह सोसायटी बनविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्राथमिक चर्चाही झाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली.

मारुती मंदिर येथे महोत्सवाच्या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी श्रीमती एन. बी. घाणेकर, श्री. गमरे, श्रीमती बोरकर उपस्थित होते. डॉ. जाखड म्हणाल्या की महोत्सवात जिल्ह्यातील 55 प्रभाग संघाचे स्टॉल सहभागी आहेत. दिवाळीच्या पार्श्‍वभुमीवर बचत गटांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यामध्ये बांबू पासून तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू, हाताने विणकाम केलेल्या वस्तू,हँडमेड आकर्षक गोधड्या,नाचणी पासून तयार केलेले विविध पदार्थ, नाचणी बिस्कीट, नाचणी सत्व, नाचणी लाडू, नाचणी शंकरपाळी, नाचणी शेव, नाचणी नानकेट, मेथी लाडू, बेसन लाडू या दिवाळीत रत्नागिरी करांच्या सेवेत स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेला भेसळमुक्त दिवाळी फराळ, चिवडा, लाडू, शंकरपाळी, चकली, करंज्या, बोरं,चिरोटे व त्याच प्रमाणे पर्यावरण पूरक हँडमेड आकाश कंदील, विविध प्रकारचे मसाले,पीठं याची लज्जतदार मेजवानी या प्रदर्शनात उपलब्ध आहे.

महिलांनी आंब्या पासून तयार केलेले विविध उत्पादने, काजू पासून तयार केलेली विविध उत्पादने, काजुगर, आमरस, कोकणी मेवा यासारखे असंख्य उत्पादने विक्रीसाठी माफक दरात आहेत. येथे शाकाहारी व मांसाहारी आणि मत्स्याहारी या पद्धतीने तयार केलेले रुचकर जेवणाचे फूड कोर्ट आहे. त्यात चिकन  बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन-65, मटन थाळी, प्रान्झ फाय, चिकन वडे, मटन वडे, चिकन भाकरी, चिकन मोमोज, चिकन कोरमा, चिकन शोरमा आहे. ग्रामीण व घरगुती चव चाखण्याची सुवर्णसंधी सरस प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध सरस प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आहे. महिलांनी उत्पादित केलेले विविध पदार्थ खरेदी करण्यासाठी आपल्या कुटुंबासह भेट घ्यावी असे आवाहन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांनी केले आहे.