शासकीय निवासस्थानातून लाखो रुपयांचे साहित्य गायब झाले; डॉ. अशोक बोल्डे यांचा थेट आरोप 

रत्नागिरी:- जिल्हा शल्यचिकित्सकांच्या शासकीय निवासस्थानात असलेल्या माझ्या साहित्याचा पंचनामा करून निवासस्थान विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सकांनी वापरासाठी घेतले. आपण आज आपले साहित्य घेण्यासाठी आलो असता तुमचे कोणतेच साहित्य नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी सांगितले आहे. तर पंचनाम्याची प्रत देण्यास त्यांनी नकार दिला. आपले लाखो रुपयांचे साहित्य गायब झाले असून त्याविरोधात आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार करणार असल्याचे माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सकपदी कार्यरत असताना डॉ.बोल्डे गीता भवन येथील शासकीय निवासस्थानात रहात होते. मुंबई येथे बदली झाल्यानंतर शासकीय निवासस्थानाला कुलूप लावून ते नव्याने नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले. त्यांनी शासकीय निवासस्थान न सोडल्याने विद्यमान शल्यचिकित्सक डॉ.संघमित्रा फुले यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या आदेशाने शासकीय निवासस्थानाचा ताबा घेतला होता. यावेळी विविध खाते, खाजगी संस्थांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत साहित्याचा पंचनामा  करण्यात आला होता.

बुधवारी डॉ.बोल्डे हे आपले साहित्य नेण्यासाठी रत्नागिरीत आले होते. त्यांनी आपले साहित्य परत घेण्याची परवानगी जिल्हाधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांच्याकडे मागितल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना त्यांना लेखी परवानगी दिली. जिल्हाधिकार्यांचे पत्र घेऊन डॉ.बोल्डे यांनी डॉ.फुले यांची भेट घेऊन आपले साहित्य परत देण्याबरोबरच साहित्याच्या पंचनाम्याची प्रत मागितली. परंतु डॉ.फुले यांनी पंचनाम्याची प्रत देण्यास नकार देत निवासस्थानी रिकामे करताना राबविण्यात आलेल्या प्रक्रियेची लेखी माहिती उपसंचालकांना कळविलेल्या पत्राची संगणक प्रिंट दिली. त्यावर जावक क्रमांकासह कोणत्याही अधिकाऱ्याची सही नसल्याचे डॉ.बोल्डे यांनी सांगितले.
आपण निवासस्थान सोडताना किचनमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य होते. पाहुण्यांसाठी महागड्या सोलापुरी चादरी आणल्या होत्या. त्या निवासस्थानात होत्या. अन्य फाईल्स, वैयक्तिक साहित्य निवासस्थानात होते. परंतु आपले कोणतेच साहित्य नसल्याचे डॉ.फुले यांनी सांगितल्याचे डॉ.बोल्डे म्हणाले.

निवासस्थान सोडताना सुमारे एक लाखाचे साहित्य आत होते. त्यातील एकही वस्तू मला देण्यात आलेली नाही. पंचनाम्याची प्रत देण्यास नकार देण्यात आला. आपले साहित्य परत घेणे हा आपला हक्क आहे. याबाबत आपण आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार करणार आहोत. त्यानंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असेही डॉ.बोल्डे यांनी सांगितले.