राजापूरात सांबराच्या शिंगांची विक्री करणार्‍या दोघांना मुद्देमालासह अटक

राजापूर:- सिंधुदुर्ग  जिल्ह्यातून तालुक्यातील उन्हाळे गाडगीळवाडी येथे सांबराची दोन शिंगे विक्रीसाठी आणणार्‍यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई केली. त्यामध्ये वेंगुले (जि.सिंधुदूर्ग) येथील अनंत त्रिंबक राणे (वय 56 ) आणि संभाजी अशोक पिंगुळकर (वय 49 ) दोघेही रा. रेडी ता. वेंगुर्ले या संशयितांना दोन सांबर शिंगे आणि सुमारे 1 लाख 19 हजार 530 रूपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल शांताराम झोरे यांनी राजापूर पोलिसात दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वेंगुले येथुन दोन इसम सांबर शिंगाची विक्री करण्यासाठी राजापुरात येत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. मोहीतकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शाह यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, बाळू पालकर, पोलिस नाईक सासवे, सत्यजीत दरेकर, शांताराम झोरे यांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्यामध्ये संशयित आरोपी अनंत राणे व संभाजी पिंगुळकर हे मारूती सुझुकी गाडीने राजापूरकडे येत असताना मुंबई गोवा महामार्गावर कोंढेतड गाडगीळवाडी येथे काल (ता.16) ही कारवाई करण्यात आली.

संशयीत वाहन उन्हाळे गाडगीळवाडी नजीक आले असताना त्याची तपासणी केली असता त्यामध्ये सांबरशिंग आढळून आले. या सांबर शिंगांची राजापूरचे वनपाल सदानंद घाटगे यांच्यामार्फत खातरजमा करण्यात आली. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना स्वत:च्या फायद्यासाठी व्यापार विक्री करण्याच्या उद्देशाने ही वन्य प्राण्यांची शिंगे बाळगल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. त्यामध्ये संशयितांकडून सांबर शिंगासह, सुझुकी कंपनीची चारचाकी मारूती कार, रिअलमी कंपनीचा एक मोबाईल, सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल व रोख रूपये 1530 असा असा सुमारे 1 लाख 19 हजार 530 रूपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुलेकर करीत आहेत.