विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या पाच गावातील निर्बंध शिथिल

संगमेश्वर: कोरोनाचा जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव व नवीन आलेला डेल्टा प्लस व्हेरीएंट यामुळे संगमेश्वर तालुक्यातील नावडी, माभळे, कसबा, कोंडगाव ही गावे विषाणूबाधित क्षेत्र म्हणून जाहीर केली होती. सोमवारी नव्याने जाहीर झालेल्या कोरोना नियमावलीप्रमाणे या गावातील निर्बंध शिथिल झाले असून सोमवारपासून सकाळी ७ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील व्यापार सुरू झाला आहे. कोंडगाव बाजारपेठ ७८ दिवसानंतर उघडण्यात आली. चाळीस गावे या बाजारपेठेवर अवलंबून आहेत.

रत्नागिरी जिल्हाधिकारी तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, डेल्टाचे रुग्ण आढळले आहेत, असे जाहीर केल्याने निर्बंध कडक करण्यात आले होते. शासनाच्या निरीक्षणानुसार नावडी, माभळे, कसबा, कोंडगाव या भागात विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. यावरुन गदारोळ सुरू झाला होता. नागरिकांनी या गावातील निर्बंध शिथिल करण्यासाठी आमदार शेखर निकम, राजन साळवी, तसेच मंत्री उदय सामंत यांच्या गाठीभेटी घेवून विनवण्या केल्या होत्या.

संगमेश्वरला सीईओच्या गाडीला घेराओ घातला होता. अखेर सोमवारपासून जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले. यामध्ये अत्यावश्यक सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ४ यावेळेत सुरु राहतील, असे जाहीर करण्यात आले. यानुसार नावडी, कसबा, माभळे, कोंडगाव या गावातील निर्बंधही शिथिल झाल्याने या गावातील अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडली गेली. संगमेश्वर तालुक्यात डेल्टा प्लस रुग्णाचा झालेला मृत्यू यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.