दोन दिवसात आठ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- ब्रेक द चेन अंतर्गत चौथ्या टप्प्यात असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यास परवानगी आहे. त्याचे उल्लंघन करणार्‍या अन्य व्यापार्‍यांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची पावले उचलली आहेत. दोन दिवसात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केले आहेत. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी शहरातील राधाकृष्ण नाका येथील तीन दुकांनदारांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आझाद स्टोअर्स, साधना स्टोअर्स, बेर्डे भांडार यांचा समावेश आहे. ही कारवाई सोमवारी (ता. 14) दुपारच्या सुमारास शहर पोलिसांच्या पथकाने केली. राधाकृष्ण नाका येथील तीन दुकानांचे व्यवस्थापक दुकाने उघडी ठेवून माल विक्री करत होते. या दुकानांमध्ये असलेल ग्राहक गर्दी करुन होते. ग्राहकांमध्ये सामाजिक अंतर ठेवण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईचे सत्र गेले दोन दिवस सुरु असून आतापर्यंत आठ जणांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

तसेच मोबाईल शॉपी अत्यावश्यक सेवेत येत नसतानाही नियमबाह्यपणे ती उघडे ठेवण्यात आली होती. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात संशयित मोबाईल शॉपी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दानिश जाहीद अन्सारी (वय 23, रा. अकबर मोहल्ला जयगड, रत्नागिरी) असे त्या संशयित चालकाचे नाव आहे. पोलिसांच्या पथकाकडून सुरु असलेल्या कारवाईमुळे प्रशासनाविरोधात व्यापार्‍यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.