13 मे पासून जाकादेवी बाजारपेठ सलग पाच दिवस बंद राहणार

केवळ वैद्यकीय सेवाच सुरू;खालगाव ग्रामपंचायतीचा निर्णय 

जाकादेवी:-रत्नागिरी तालुक्यातील खालगाव जाकादेवी बाजारपेठेमध्ये कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने खांलगाव ग्रामपंचायत आणि व्यापारी संघटना यांची आज मंगळवार दिनांक अकरा मे रोजी महत्वपूर्ण झालेल्या बैठकीत कडक लॉक डाऊनचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

खालगाव जाकादेवी परिसरात कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात वाढू नये ,म्हणून खालगाव ग्रामपंचायत आणि जाकादेवी परिसर व्यापारी संघटना यांच्यावतीने गुरुवार दिनांक 13  मे ते सोमवार दिनांक 17 मे या पाच दिवसीय कालावधीत वैद्यकीय सेवा वगळून बाजारपेठेतील इतर सर्व दुकाने  सलग पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .या बंद कालावधीत जर कोणी दुकाने उघडली तर ग्रामपंचायत खालगाव यांच्यावतीने अशा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा सर्वानुमते ठराव आजच्या बैठकीत पारित करण्यात आला.केवळ वैद्यकीय सेवा वगळून येथील कडक लॉकडाऊन करण्याच्या निर्णयाला छोट्या-मोठ्या व्यापारी ,विक्रेते वर्गाने चांगला प्रतिसाद द्यावा ,असे आवाहन खालगावचे  विद्यमान सरपंच प्रकाश खोल्ये, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष,माजी सैनिक मधुकर उर्फ काका रामगडे ,खालगावचे  पोलीस पाटील प्रकाश जाधव व जाकादेवी व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे. 13 मे पासून कडक लॉकडाऊन असल्याने व्यापारी संघटना व ग्राहकांनी या आवाहनाला चांगला प्रतिसाद द्यावा ,असे आवाहन ग्रामपंचायत खालगाव यांनी केले आहे.या कालावधीत बाजारपेठेत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस यंत्रणा बारकाईने नजर ठेवणार आहे‌.वाहनांचीही तपासणी होणार आहे. त्यामुळे विनाकारण नागरिकांनी बाजारपेठेत फिरू नये ,असे आवाहनही खालगाव ग्रामपंचायतीने केले आहे.