जिल्ह्यात येणार्‍यांची कोरोना चाचणी बंधनकारक

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखायचा असले तर कडक अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही. कोणालाही अत्यावश्यक सेवा किंवा महत्त्वाच्या कामा शिवाय घराबाहेर पडता येणार नाही. जिल्ह्याच्या सिमांवर देखील वाहनांची तपासणी होईल. रेल्वे, बस स्थानक येथीही प्रवाशांची तपासणी होईल. जिल्ह्यात येणार्‍यांची कोरोना चाचणी बंधनकारक आहेत. तरच त्याला प्रवेश दिला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. झुम अ‍ॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, जिल्ह्यात होणार्‍या लॉकडाऊमध्ये पंधरा दिवसाचा कर्फ्यू आहे. या वेळेत अत्यावश्यक सेवेशिवाय कोणीही बाहेर पडू शकत नाही. काही सवलती सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत, अत्यावश्यक सेवा, वाहतूक, सार्वजनिक प्रवास करायाचा असले तर तसे ठोस कारण असणे आवश्यक आहे. त्याशिवार प्रवासाची परवानगी नाही दिली जाणार नाही.  उद्यापासून तपासणी नाक्यावर कडक तपासणी केली जाईल. विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई करू. नियम पाळून स्थानिक पातळीवर कोरोनाला नियंत्रित करायचे आहे. तपासण्या वाढविल्यामुळे 30 एप्रिलपर्यत 5 हजारापर्यंत बाधितांचा आकडा जाऊ शकतो, असा अंदाजही आहे.

अत्यावश्यक सेवेसाठी काही सवलती दिल्या आहेत. खाद्यपदार्थाचे दुकाने, भाजीपाला हे बंद राहणार आहेत. मात्र त्यांना होम डिलिव्हरी (घरपोच सेवा) देता येणार आहे. तसेच ज्या व्यापार्‍यांना मनुष्यबळा ऐवजी होमडिलिव्हरी देता येत नाही. त्यांनी संपूर्ण चाचणी करून परवानगी घेऊन आळीपाळीने दुकाने उघडी ठेवता येतील का, याबाबत विचार सुरू आहे. होम डिलिव्हरी करणार्‍यांकडे परवानगीचे स्टिकर असणे बंधनकारक आहे. बांधकाम व्यवसायावर ही बंधने घेतली आहेत. पावसापूर्वीच्या कामांनाच परवानगी दिली आहे. सार्वजनिक बांधकामचा तो अधिकृत ठेकेदार असणे अनिवार्य आहेत. बांधकाम कामगारांची राहण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी त्यांची चाचणी करून काम सुरू ठेवता येणार आहे. पेट्रोल पंपावर आता अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या वाहनांनाच पेट्रोल मिळणार आहे.

पॅकिंगशी निगडित काही उद्योग बंद ठेवण्यात येणार आहेत. तर काही 50 टक्के कामगारांच्या उपस्थितीला उद्योग सुरू ठेवले जाणार आहेत. मात्र त्यांची चाचणी बंधनकारक आहे. शासकीय कार्यालयातही 50 टक्के कर्मचारी राहतील. कामासाठी येणार्‍यांना प्रवेश बंद आहे. एसएमएस संदेशाद्वारे त्यांची कामे केली जातील.

रेस्टॉरंट, बार, हॉटेल बंद राहणार आहेत. त्यांना होम डिलिव्हरीची मुभा आहे. रस्त्याच्या बाजूचे वडापावच्या गाड्या बंद राहतील. भाजीपाल्यासाठी एक ठिकाण निश्‍चित करून त्या-त्या वॉर्डमध्ये विक्री करण्याची सवलत दिली जाईल. जिल्ह्यात कर्‍हाड, सातारा, कोल्हापूर आदी ठिकाणाहून व्यापार्‍यांची गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. शॉपिंग सेंटर, मॉल इतर सर्व बंद आहे. सांस्कृतिक सार्वजनिक कार्यक्रम, बंद, शाळा महाविद्यालय, खासगी क्लासेस, सलून, स्पा बंद राहतील. लग्न समारंभाला 25 व्यक्तींची परवानगी असली तरी ते पुढे ढकलावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केली.