पालीत जलवाहिनी फुटून पाणी पुरवठा बंद

रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. हे काम सुरु असताना पाली बाजारपेठेतील जलवाहिनी फुटून पाणीपुरवठा बंद झाला आहे. जुन्या महामार्गाजवळ असलेली ग्रामपंचायतीची शासकीय पाणी योजना जलवाहिनी स्थलांतरीत केलेली नसल्याने हा गोंधळ निर्माण झालेला आहे. याबाबत पाली पंचक्रोशीतून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

पाली बाजारपेठेत महामार्ग चौपदरीकरणाची ठेकेदाराकडून अद्यापही भुसंपादन प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ठेकेदाराने गेल्या आठवड्यापासून पाली बाजारपेठच्या दोन्ही भागात रस्त्यालगत मातीचा भराव आणून सपाटीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे पाणी योजनेची जलवाहिनी फुटली आणि पाणी पुरवठा बंद झाला. याला आठ दिवस झाले तरीही अजुन त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. याकामापुर्वी पाली ग्रामपंचायतीची जुनी शासकीय पाणी योजना स्थलांतरण करणे आवश्यक होते. दोन्ही बाजुकडील चौपदरीकरणातील बाधीत होणारी बांधकामे हटवलेली असून खाजगी कंत्राटदाराने  प्राधान्याने पाणी योजेनेचे जलवाहिनीचे  स्थलांतरण करणे आवश्यक आहे. पालीतील या पाणीपुरवठा जलवाहिनीच्या कामाकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने वेळीच लक्ष देऊन ठेकेदाराकडून पर्यायी पाणी व्यवस्था करणेची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गेल्या आठ दिवसांपासून बाजारपेठ, नवीनवसाहत कोल्हापूर रोड या भागातील पाणी पुरवठा बंद असून त्यावर लवकर कार्यवाही व्हावी अशी मागणी होत आहे.