निसर्ग वादळाचा तडाखा बसलेल्या 269 दिव्यांगांना मदतीचा हात

रत्नागिरी:- कोरोनाच्या संकटाबरोबरच आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने मंडणगड, दापोली तालुक्यांना तडाखा बसला होता. यामध्ये अनेकांची घरे, बागाच्या बागा उध्वस्त झाल्या. त्यात दोन्ही तालुक्यातील 269 दिव्यांगाचाही समावेश होता. त्यातून उभारी घेण्यासाठी जिल्हा परिषदेकडून आर्थिक मदतीचा हात देण्यात आला.

निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंडणगड, दापोली तालुक्यांचा दौरा केला होता. त्यामध्ये आढावा घेतल्यानंतर दोन्ही तालुक्यातील बाधित व्यक्तींना आधार देण्यासाठी मंत्री सामंत यांनी जिल्हापरिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार योगेश कदम, उपाध्यक्ष महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती ॠतुजा जाधव, आरोग्य सभापती बाबू म्हाप यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांनी केलेल्या सुचनेनंतर या दिव्यांगाना जिल्हा परिषद फंडातून मदत देण्याबाबतची पावले उचलण्यात आली. त्यानुसार मंडणगडमधील 184 आणि दापोलीतील 85 दिव्यांगांना प्रत्येकी पाच हजार रुपये मदत वाटप करण्यात आली. कोरोनातील टाळेबंदीत अनेक दिव्यांगांना फटका बसला होता. त्यांना 1,159 रुपयांप्रमाणे 5,555 दिव्यांग व्यक्तींना जिल्हा परिषदेकडून आर्थिक साह्य देण्यात आले. ऐनवेळी केलेल्या मदतीबद्दल जिल्ह्यातील दिव्यांगांकडून धन्यवाद दिले जात आहेत.