लांजा:- मुंबई गोवा महामार्गावर कुंभारवाडी येथे ईको कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने ३८ वर्षाच्या मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी १.२५ वाजण्याच्या दरम्यान घडली.
या अपघातामध्ये मृत्यु झालेला मोटारसायकल स्वार हा देवधे गावातील असून तो गवंडी काम करत होता. लांजाहून देवधे येथे आपल्या घरी बाजार घेवून जात असताना समोरुन येणाऱ्या ईको गाडीच्या चालकाने भरधाव वेगामध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवधे मणचेकरवाडी येथील विकास सिताराम राप ( वय – ३८ ) हा आपल्या ताब्यातील मोटारसायकल हिरो होंडा स्प्लेन्डर प्रो क्र. एच . एच . ०८ एक्स ५२६३ घेवून देवधे येथून लांजा येथे बाजार घेण्यासाठी आला होता. बाजार घेवून झाल्यानंतर तो आपली मोटारसायकल घेवून दुपारी लांजा ते देवधे असा जात असता मुंबई- गोवा महामार्गावर कुंभारवाडी, कुक्कुटपालन येथे दुपारी १.२५ वा. आला असता लांजाकडे येणार्या ईको कार क्र. एम. एच. ०२ बीटी ३८१३ ने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही ईको कार आदित्य सुनील पाटील ( वय – २१ ) रा. लांजा सार्दळवाडी हा चालवित होता. ही धडक एवढी जोरदार होती की, मोटारसायकल स्वार २१ फुटावर साईट पट्टीवर जावून पडला. विकास राप यांनी हेल्मेट घातल्याने त्यांच्या डोक्याला कोणतीच इजा झाली नाही . मात्र तो खाली पडला त्यावेळी त्यांचा उजवा पाय व हात मोडून पडले. त्यांच्या हनुवटीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे या अपघातामध्ये मोटारसायकलस्वार विकास राप हा जागीच ठार झाला.
अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिरगावकर, हेडकाँन्टेबल राजेंद्र कांबळे, शांताराम पंदेरे, रहिम मुजावर आदींनी घटना स्थळी जावून पंचनामा केला .