एनआरएमयु नेत्याचा तीन राज्यातून अनधिकृत प्रवास

रत्नागिरीत घेतली रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्हा प्रशासनाला गुंगारा

रत्नागिरी:- कोरोना विषाणूचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दुसऱ्या राज्यातून तसेच इतर जिल्ह्यातून येण्यास बंदी आहे. जर प्रवास करायचा असेल तर ई-पास घेऊन प्रवास करता येतो. मात्र, असे असताना कोकण रेल्वेच्या मान्यता प्राप्त संघटनेच्या (NRMU) काही पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात अनधिकृतपणे प्रवास केला. ते एवढ्यावरच न थांबता कोकण रेल्वेच्या रत्नागिरी कार्यालयात काही अधिकाऱ्यांसोबत बैठकही घेतली. त्यानंतर चार दिवस मान्यता प्राप्त संघटनेचा पदाधिकारी हा रत्नागिरीत ठाण मांडून होता. तरीही कोणत्याही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाला याची माहितीही दिलेली नाही. दरम्यान, याआधी रेल्वेच्या एका कर्माचाऱ्याचा  मृत्यू झाला होता. तसेच कोकण रेल्वेचा आणखी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यावेळी त्यांच्यासंपर्कात आलेल्या जवळपास ५२ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. कोविड-१९चा धोका असताना सुध्दा दुसऱ्या राज्यातून आणि दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्यांची माहिती आरोग्य विभागाला का देण्यात आली नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.