अव्वाच्या सव्वा बिल; ग्राहक पुरते हैराण
रत्नागिरी:- महावितरणच्या बिलांनी ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. मार्च महिन्यापासून सलग तीन महिने रीडिंग न घेता मार्च महिन्याच्या सरासरी रीडिंगवर बिले काढली आहेत. तरी तीन महिन्याचा ठोकताळा न बसता अव्वाच्या सव्वा बिल आल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. अनेक ग्राहकांनी आपले गार्हाणे घेऊन महावितरणच्या कार्यालयावर गर्दी केली; मात्र बहुतांशी ग्राहकांना ‘आमच्या हातात काही नाही’, असे सांगून परत पाठविण्यात आले.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळामध्ये वीज वितरण कंपनीचा कोणताही कर्मचारी थेट ग्राहकांच्या घरी मीटर रीडिंगसाठी आला नाही. अनेक वीज ग्राहकांनी मार्च महिन्याची प्राप्त झालेली वीजबिले तत्काळ संबंधित कार्यालयात तर ऑनलाइन पद्धतीने भरणा केली; मात्र त्यानंतर लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले आणि शासनाने बँक हप्त्यापासून अनेक व्यवहारात सवलत दिली. मात्र महावितरण कंपनीने मार्च महिन्यातील ग्राहकांच्या सरासरी रीडिंगचा वापर करून पुढील दोन ते तीन महिन्यातील बिले ग्राहकांच्या माथी मारली आहेत. नेहमी 500 ते 600 रुपये बिल येणार्यांना एकदम साडेतीन हजार तर हजार ते दीड हजार बील येणार्यांना एकदम पाच ते सहा हजार बील आल्याने ग्राहकांना शॉकच बसला आहे. लॉकडाऊनमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या ग्राहकांना महावितरणचा हा मोठा झटका दिला आहे.
सामान्य ग्राहक तर भरमसाठ बिल आल्याने महिन्याच्या खर्चाची घडी कशी बसवायची, या विवंचनेत पडला आहे. ग्रामीण भागामध्ये विजेचा जास्तीत जास्त वापर होईल अशी उपकरणे लोकांकडे नसतात तरी अव्वाच्या सव्वा बील आल्याने ग्राहकांनी तोंडात बोटे घातली आहेत. महावितरण कंपनीने युनिटची शहानिशा करून योग्य ती वीज बिलाची आकारणी करावी, अशी मागणी ग्राहकांनी उचलून धरली आहे. कंपनीने तत्काळ मागील युनिटनुसार बिल द्यावे अन्यथा वीजबिल भरणा न करण्याचा इशाराही ग्राहकांनी दिला आहे. नाचणे, झाडगाव आदी महावितरणच्या कार्यालयात याबाबत तक्रारी घेऊन आलेल्या ग्राहकांनी गर्दी केली होती.