पेट्रोल आणि डिझेल दरवाढीची हॅट्रिक

रत्नागिरी:- सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीची हॅट्रिककरून ग्राहकांना झटका दिला. आज मंगळवारी देशभरात पेट्रोल आणि डिझेल प्रती लीटर सरासरी ४० ते ६० पैशांनी वाढले. मुंबईत रविवारपासून पेट्रोल १ रुपया १७ पैशांनी महागले आहे. तर डिझेल दरात १ रुपया १६ पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा भाव ७९.४९ रुपये झाला.आज त्यात ५८ पैशांची वाढ झाली. सोमवारी ७८.९१ रुपये आणि रविवारी तो ७८.३२ रुपये होता. डिझेलचा भाव ६९.३७ रुपयांपर्यंत वाढला.सोमवारी डिझेल ६८.७९ रुपये होते. आज मुंबईत डिझेल ५८ पैशांनी महागले. राज्य सरकारने नुकताच इंधनावरील व्हॅटच्या अधिभारात वाढ केली होती. त्यामुळे राज्यात पेट्रोल आणि डिझेल २ रुपयांनी महागले होते.