औषधांचा तत्काळ पुरवठा; पोलिस निरीक्षक सुरेश कदमांची तत्परता
रत्नागिरी:- कोरोनाने पोलिसांमधील विविध गुणांचे दर्शन ठिकठिकाणी घडवून आणले आहे. रत्नागिरीतही ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी उक्षीतील वयोवृद्ध चाकरमानी जोडप्यांच्या औषधांची गैरेसोय दूर करत समाजसेवेचा अनोखा आदर्श घालून दिला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणार्या उक्षीत मुंबईतून आलेले वयस्कर गोणभरे हे काही कामानिमित्त मुंबईतून आपल्या उक्षी या गावी आले होते. लॉकडाऊनमुळे त्यांना पुन्हा मुंबईला परत जाता आले नाही. दोन्ही नवरा बायको वयोवृद्ध आहेत. घरात दुसरे कोणी नाही. वय जास्त आल्यामुळे त्यांचे जगणे औषधावरच आहे. मुंबईतून आल्यावर त्यांनी आणलेली औषधे संपली. आता नेमके करायचे काय? हा प्रश्न वयस्कर पती-पत्नीला पडला होता. त्यांच्या घरासमोरच उक्षी चेकपोस्ट आहे. त्यांनी तिकडे संपर्क करत थेट ग्रामीण पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांचा नंबर घेतला. कदम यांना संपर्क साधत औषधे संपल्याची माहिती दिली. कोरोनाच्या कालावधीत रत्नागिरी तालुक्याच्या ग्रामीण भागात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पोलिस निरीक्षक सुरेश कदम यांनी तत्काळ गोणभरे यांची अडचण समजून घेतली. कर्मचार्याकडे पैसे देऊन ती औषधे आणण्याची तजवीज केली. ती औषधे घेऊन स्वतः कदम त्या वृद्ध दाम्पत्याच्या उक्षीतील घरी पोचले. या तत्परतेमुळे वृद्ध दाम्पत्यही समाधानी झाले होते.