रत्नागिरी :- कोरोनाचा प्रादुर्भावानंतर जिल्ह्याच्या कानाकोपर्यातील जनतेला सुरक्षिततेच्या सुचना देण्यापासून परगावातून आलेल्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे काम आशा, अंगणवाडीसेविका करत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत राज्य शासनाने प्रत्येकी एक हजार रुपये महिन्यांसाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून जाहीर केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 1285 आशा स्वयंसेविकांना याचा लाभ दिला जाणार असून 38 लाख 55 हजार रुपये शासनाकडून आरोग्य विभागाला प्राप्त झाले आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात काम करणार्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर आणि ग्रामपंचायत कर्मचार्यांना प्रत्येकी 1 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केला होता. त्याची तत्काळ अंमलबजावणी सुरु झाली आहे. ग्रामविकास विभागांतर्गत सर्व यंत्रणा जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कोरोना महामारीच्या संकटाचा मुकाबला करीत आहेत. अपुर्या सुरक्षिततेच्या साधनांचा आशा कर्मचारी कार्यरत आहेत. आशांना शासनाकडून मानधन दिले जाते. त्या मानधनाबरोबरच प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये दिले जाणार आहेत. त्याची रक्कम जिल्हास्तरावर पाठवण्यात आली आहे. त्याचे वाटपही सुरु झाले आहे. एप्रिल महिन्याच्या मानधनात हे अनुदान जमा करण्यात येणार आहे.