शृंगारतळीत धाडसी चोरीचा प्रयत्न

‘ओंकार ज्वेलर्स’चे शटर तोडून चोरट्यांचा शिरकाव

गुहागर:- गुहागर तालुक्यातील गजबजलेली बाजारपेठ असलेल्या शृंगारतळी येथे चोरीचा एक थरारक प्रकार समोर आला आहे. येथील ‘ओंकार ज्वेलर्स’ हे सोन्या-चांदीचे दुकान फोडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्यांनी केला. सुदैवाने, चोरट्यांचा हा प्रयत्न फसला असला तरी, बाजारपेठेतील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शृंगारतळी बाजारपेठेतील ‘ओंकार ज्वेलर्स’ या दुकानाचे मालक सुनील किशोर गुहागरकर (वय ३४, रा. जानवळे) यांनी दररोजप्रमाणे १७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता आपले दुकान बंद केले होते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने दुकानाच्या बाहेरील शटरचे कुलूप कोणत्यातरी हत्याराने कापले.

शटर उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि आतील बाजूला असलेले दुसरे शटरही कुलूप कापून उघडण्याचा प्रयत्न केला. दुकानातील सोन्या-चांदीचे मौल्यवान दागिने आणि वस्तू लंपास करण्याचा चोरट्यांचा कट होता, मात्र तांत्रिक अडचणींमुळे चोरटे चोरी न करताच पसार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ९:१५ च्या सुमारास सुनील गुहागरकर दुकान उघडण्यासाठी आले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने गुहागर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

१७ फेब्रुवारी रात्री ८:०० ते १८ फेब्रुवारी सकाळी ९:१५ च्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शृंगारतळीसारख्या मुख्य बाजारपेठेत सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण आहे. गुहागर पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.