रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातील स्टाफ पार्किंगमधून एक दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​फिर्यादी विलास विश्वास तांबे (वय ४२, रा. पत्रकार कॉलनी, कुवारबाव) हे रेल्वे स्थानक परिसरात नोकरीस आहेत. त्यांनी आपली काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (क्र. MH 08 AH 1974) ही मोटारसायकल १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:२० वाजता रेल्वे स्थानकाच्या स्टाफ पार्किंगमध्ये उभी केली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ते तिथे गेले असता, त्यांची दुचाकी तिथे मिळून आली नाही.

​अज्ञात चोरट्याने संधी साधून पार्किंगमधून सुमारे १५,००० रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली आहे. सर्वत्र शोध घेऊनही गाडी न सापडल्याने अखेर १८ फेब्रुवारी रोजी त्यांनी पोलिसांत धाव घेतली व त्या दिवशीच ​कलम: भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) गुन्हा नोंद करण्यात आला.

​या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरातील वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत.