९१ टक्के उद्दिष्ट साध्य; जिल्ह्यात ३० हजार ९८७ दस्त नोंदणी
रत्नागिरी:- जिल्ह्यातील नोंदणी आणि मुद्रांक विभागाची या वर्षाची आर्थिक उलाढाल १५९. ७७ कोटी झाली आहे. जिल्ह्याला मिळालेल्या इष्टांकाच्या तुलेनत या विभागाने ९१ टक्क्यांपेक्षा जास्त मुद्रांक शुल्क वसूल केले आहे. यामध्येही रत्नागिरी, दापोली आणि चिपळूण या तीन तालुक्यांमधून सर्वांत जास्त उत्पन्न मिळाले आहे. यातून जिल्ह्यात ३० हजार ९८७ दस्तांची नोंदणी झाली आहे.
स्टॅम्प ड्युटी अर्थात मुद्रांक शुल्क हा एक टॅक्सचा प्रकार आहे. ज्याला सरकारी फी असेही म्हणतात. जो मालमत्तेसंबंधी विविध खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर लावला जातो. हा शुल्क राज्य सरकारतर्फे आकारला जातो जे प्रत्येक राज्यांत वेगवेगळे असू शकतो. मालमत्ता व्यवहार असो वा कोणतीही कायदेशीर प्रक्रिया तिथे मुद्रांक शुल्क (Stamp Duty) हा शब्द सर्रास ऐकण्यात येतो. गेल्या आर्थिक वर्षात अर्थात मार्च २०२३ ते मार्च २०२४ मध्ये जिल्ह्याला मुद्रांक नोंदणी विभागाला १७५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्येही रत्नागिरी तालुक्याला ५४.३७, दापोली ३४.६६, चिपळूण २४.१३ आणि खेड तालुक्यासाठी १२.१३ कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या चार तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमध्ये मात्र कमी कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
रत्नागिरी तालुक्याने सर्वाधिक म्हणजेच ५३ कोटींचा महसूल मिळाला आहे. चिपळूण तालुक्याने उद्दिष्ट पार करत ३० कोटींचा महसूल मिळवून दिला आहे. सहजिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विविध प्रकारच्या सेवा पुरवल्या जातात. यामध्ये बहुतांशी मुद्राकं शुल्क हे जमीन खरेदी-विक्री व्यवहार, तारण, भाडेकरार, अन्य शासकीय अथवा बॅंकसाठी लागणारे करार यासाठी मोठ्या प्रमाणात मुद्रांक शुल्क जमा केले जाते. जिल्हा प्रशासनातील मोठ्या प्रमाणात महसूल उभे करण्याचे काम हे नोंदणी आणि मुद्रांक विभाग करत आहे.