बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा वाढवायला एकजुटीने सज्ज व्हा

रत्नागिरीत उबाठा कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा 

रत्नागिरी:- वरिष्ठांकडून फारसे सहकार्य नाही, प्रसिध्द पत्रके छापायला पैसे नाहीत, मात्र निष्ठावंत कार्यकर्त्यांची सोबत असल्यानेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत रत्नागिरी तालुक्यात उबाठाला 45 हजारहून अधिक मते मिळाली. समोरुन विविध आमिषे, पैशाची बरसात झाली तरी कट्टर शिवसैनिक हटला नाही हेच शिवसैनिकांचे प्रेम आता टिकवायला हवे असेल तर तालुक्यात पुन्हा एकदा उबाठाच्या पदाधिकाऱ्यांची एकजुट दिसली पाहिजे अशा भावना पदाधिकारी व ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. या बैठकीमुळे मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उबाठा शिवसेना आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाली आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उबाठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा जयेश मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी स्टेजवर फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा होता. यापूर्वीही स्व. बाळासाहेबांच्या आदेशाने शिवसेना चालत होती आणि आताही बाळासाहेबांना साक्षीला ठेवूनच तालुक्यात शिवसेना वाढवायचा संकल्प या मेळाव्यात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

दिग्गजांची उपस्थिती अन्‌‍‍ कार्यकर्त्यांचा उत्साह या मंथन बैठकीला ज्येष्ठ नेते उदय बने, प्रमोद शेरे, शेखर घोसाळे, उत्तम मोरे, किरण तोडणकर, ममता जोशी यांच्यासह प्रथमेश गावणकर, परशुराम कदम यांच्यासह सर्व उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. जनतेच्या प्रश्नांवर रान उठवण्यासाठी आणि गद्दारांच्या बालेकिल्ल््यांना खिंडार पाडण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली आहे.

रत्नागिरी तालुक्यात राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आता उबाठा शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक मोडमध्ये आली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर मंगळवारी पार पडलेली तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक केवळ आढावा बैठक न ठरता, तो आगामी राजकीय संघर्षाची एल्गार ठरली. “गद्दारांना बाजूला फेका आणि निष्ठावंतांच्या जोरावर भगवा पुन्हा फडकवा,“ असा एकच सूर या बैठकीत उमटला.  सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेसह विविध सरकारी योजनांचा पाऊस पाडला, यंत्रणेचा वापर केला, तरीही रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला तब्बल 45 हजार मतदारांनी कौल दिला आहे. हे मताधिक्य म्हणजे केवळ आकडा नसून, तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील अढळ विश्वास आहे. “कोणतीही मोठी रसद पाठीशी नसताना आणि सत्तेचा कोणताही वरदहस्त नसताना जनतेने दिलेली ही साथ म्हणजे उबाठा आजही संपलेली नाही, तर ती जनमानसात खोलवर रुजलेली आहे,“ असे प्रतिपादन यावेळी नेत्यांनी केले.  या बैठकीचे मुख्य सूत्र भविष्यवेधी संघटना हे होते. गद्दारी करून गेलेल्यांना आता पक्षात थारा नसेल, हे स्पष्ट करत एकाच खंबीर नेतृत्वाखाली काम करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. पक्ष वाढवण्यासाठी गावपातळीवर पुन्हा एकदा जोमाने जाळे विणण्याचा निर्धार करण्यात आला आहे. विशेषतः तरुणांना पक्षात मोठी संधी, मार्गदर्शन आणि बळ देण्याचा मानस नेत्यांनी बोलून दाखवला. “उबाठाची ताकद आजही कायम आहे, हे या निवडणुकीने सिद्ध केले असून, आता हीच ताकद संघर्षासाठी वापरली जाईल,“ असा इशारा देण्यात आला.