प्रशासनाकडून दबावाखाली मुन्ना देसाई यांच्यावर कारवाई: परशुराम कदम

रत्नागिरी:- नुकत्याच झालेल्या जि.प. आणि पं.स. निवडणुकीनंतर हातखंबा गटातील कार्यकर्ते केदार उर्फ मुन्ना देसाई यांच्यावर होणाऱ्या प्रतिबंधात्मक कारवाया या जाणून बुजून केल्या जात असल्याचा आरोप माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी केला असून, प्रशासनाने दबावापोटी होणाऱ्या कारवाया न थांबवल्यास रास्तारोकोचा इशारा दिला आहे.

जि.प. व पं.स. निवडणुकीत केदार उर्फ मुन्ना देसाई यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांचे काम केले होते. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून जुने विषय उकरुन काढून पोलीस व प्रशासकीय यंत्रणेमार्फत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप परशुराम कदम यांनी केला आहे. निवडणुकीनंतर गावात शांततेचे वातावरण असून, हे वातावरण बिघडवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणा दबावाखाली करीत आहे. मुन्ना देसाई हे नेहमीच विविध घटनांमध्ये मदतीला धावणारा तरुण आहे. त्यातच आता शिमगोत्सव येत असून प्रशासनाने दबावापोटी कारवाया थांबवाव्यात असे आवाहन परशुराम कदम यांनी केले असून नाहीतर हातखंबा गावातील देसाई यांच्या पाठीश असणारे ग्रामस्थ रास्तारोको करतील असा इशाराही दिला आहे.