मुंबई:- हिंदी चित्रपटसृस्ष्टीतील ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने, त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर उपचारादरम्यान, त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात दाखल केल्यापासूनचं त्यांचे चाहते आणि संपूर्ण बॉलिवूड त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. पण, आज पहाटे उपचार सुरू असताना दिलीप कुमार यांनी जगाचा निरोप घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
दिलीप कुमार यांनी ‘ज्वार भाटा’ या सिनेमातून १९४४ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातील दुःख दिलीप कुमार यांनी त्यांच्या अभिनयातून उतरवलं आणि पुढची अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. ‘बाबूल’, ‘दीदार’ ‘आन’ ‘गंगा-जमुना’, ‘मधुमती’, ‘देवदास’ अशा कितीतरी सिनेमांची नावे घेतला येतील.
पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो.
देवदास ही बंगाली लेखक शरतचंद्र यांची कादंबरी. बालमैत्रीण पारोवर प्रेम असूनही तिच्याशी लग्न न करता आलेला आणि त्यानंतर दारूच्या नशेत आकंठ बुडालेला, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत पारोचा ध्यास घेतलेला ‘देवदास’ दिलीप कुमार यांनी ज्या तन्मयतेने रंगवला त्याला खरोखरच जवाब नाही. १९९८ मध्ये आलेला ‘किला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.