दारूच्या व्यसनातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

अणसुरे येथील घटना

राजापूर:- तालुक्यातील अणसुरे आडीवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दारूच्या व्यसनातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पांडूरंग दत्ताराम कणेरी (वय ३० वर्षे, रा. अणसुरे आडीवाडी) याला दारूचे मोठे व्यसन होते. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास पांडूरंग याने दारूच्या नशेत अणसुरे आडीवाडी येथील चिरेखाण परिसरातील एका कुंभ्याच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या रस्सीने गळफास लावून घेतला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तिथे धाव घेतली, मात्र तोपर्यंत पांडूरंगचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती राजापूर पोलीस ठाण्यात देण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. या घटनेची नोंद अकस्मात मृत्यू नोंद क्र. ०७/२०२६ नुसार करण्यात आली आहे.

​अवघ्या ३० वर्षांच्या तरुणाने व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्यामुळे अणसुरे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.