रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील ओरी येथील घवाळवाडीतील बारा वर्षीय मुलगा मित्रासोबत खेळताना पडला. यात त्याचा आकस्मिक मृत्यू झाला. सदर घटना सोमवारी दि. २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या घटनेतील मृत मुलाचे नाव पारस प्रदिप घवाळी (वय १२ वर्ष रा. ओरी घवाळवाडी) असे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारस घवाळी हा कृष्णा सिताराम पातये यांच्या गुरांच्या गोठ्यात मित्रासोबत खेळत होता. खेळता खेळता तो खाली पडून लगेच त्याला उलटी झाली. उलटी आल्याने त्याला मित्रानी लगेचच पाणी पाजले. यानंतर पारस हा तिथून स्वतः घरी आला.
दरम्यान घरी आल्यावर तो बेशुध्द पडला. तत्काळ घरच्यांनी पारसला उपचाराकरीता जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून अधिक उपचाराकरीता त्याला रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रातून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले. मात्र उपचारादरम्यान पारसची प्राणज्योत मावळली. या घडलेल्या धक्कादायक घटनेनं ओरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.