रत्नागिरी:- सलग तिसर्या दिवशी जिल्ह्यात पाच हजार कोरोना चाचण्या करण्यात प्रशासनाला शक्य झाले आहे. यामध्ये 440 बाधित सापडले असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 8.68 टक्के आहे. तर दिवसभरात जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झाला असला तरीही मागील काही दिवसातील 25 मृतांची नोंद शुक्रवारी झाली. मृतांचे टक्का वाढल्यामुळे जिल्हावासीयांची चिंतेत भर पडली आहे.
शुक्रवारी झालेल्या चाचण्यात 4 हजार 628 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. बाधितांमध्ये 235 आरटीपीसीआरमधील असून 205 अॅण्टीजेनमधील आहेत. सर्वाधिक 122 बाधित रत्नागिरी तालुक्यात सापडले.
बाधितांची संख्या घटली तरीही मृतांच्या नोंदीत शुक्रवारी वाढ झाली. दिवसभरातील 8 जणांसह त्यापुर्वी मृत पावलेल्या 25 अशा एकुण 33 मृतांची नावे आज नोंदली गेली. चोविस तासातील मृतांमध्ये रत्नागिरी 3, संगमेश्वर 1, दापोली 1, लांजा 1, खेड 2 जणांचा समावेश आहे. तसेच यापुर्वी मृत पावलेल्यांमध्ये कामथे रुग्णालय 7, कळंबणी 1, लांजा 2, रत्नागिरी खासगी रुग्णालय 8, सावर्डे 1, दापोली 1, चिपळूण खासगी रुग्णालये 5 मृत आहेत. जिल्ह्यातील एकुण मृतांची संख्या 1 हजार 607 झाली असून मृत्यूदर 3.41 टक्के आहे.