सदोष घरगुती मीटरच्या जागी स्मार्ट मीटर

रत्नागिरी:- लोकांचा मोठा विरोध असल्याचे पाहून राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित केलेला स्मार्ट प्रिपेड मिटर बसवण्याचा निर्णय आता कार्यवाहीत आणण्यात येत आहे. घरगुती ग्राहकांचे वीज मीटर बदलायचे असतील स्मार्ट प्रिपेड मीटर देण्यात येत आहेत. सदोष मीटरच्या जागी स्मार्ट मीटर बसवण्याचे धोरण महावितरणने स्पष्ट केले आहे.

१ जानेवारीला या संदर्भात महावितरणचा निर्णय जारी करण्यात आला. मीटर बदलण्याचे काम तातडीने सुरू करावे, असे कर्मचाऱ्यांना सूचवण्यात आले आहे. गतवर्षी चार कंपन्यांना मीटर बदलण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या कंपन्यांनी मीटर बदलण्याची तयारी चालू केली. परंतु ग्राहकवर्गातून तीव्र आक्षेप घेण्यात आला. सुरू असलेले मीटर बदलून त्या जागी स्मार्ट मीटर बसवण्यामागे कोणाचे भले होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

यानंतर शासकीय कार्यालये तसेच वसाहतींमधील रोहित्रे त्याचप्रमाणे उपकेंद्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम युद्धपातळीवर ‘हाती घेण्यात आले. आता हे मीटर घरगुती ग्राहकांना देण्याचा निर्णय झाला आहे. यासाठी सदोष मीटर शोधून तेथे हे मीटर बसवण्याचे ठरवण्यात आले आहे. यामुळे थेट विरोध होण्याची’ शक्यता कमी असल्याचा आडाखा बांधण्यात आला आहे.

राज्यात १८ लाख १७ हजार एवढे सदोष मीटर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे सर्व मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचे ठरवण्यात आले आहे. २६ हजार कोटी रुपये खर्चुन २.४१ कोटी मीटर बदलले जाण्याची जबाबदारी ४ कंपन्यांवर सोपवण्यात आली होती. भांडूप, कल्याण, कोकण, बारामती आणि पुणे येथे १.१६ मीटर बसवण्याचे काम अदानी पॉवर कंपनीकडे देण्यात आले आहे.

बिलिंग प्रणालीचा दर्जा सुधारेल

सदोष मीटरच्या जागी बसवण्यात आलेले स्मार्ट प्रिपेड मीटर सामान्य मीटरप्रमाणे काम करतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये फक्त प्रिपेडचा पर्याय असेल. मीटर बसवल्याने बिलिंग प्रणालीचा दर्जा सुधारेल, अशी अपेक्षा महावितरणने व्यक्त केली आहे. सध्या सुरू असलेले जुन्या प्रकारचे मीटर बदलून तेथे स्मार्ट मीटर बसवण्याचा पडद्यामागचा डाव हळूहळू वास्तवात आणण्यासाठी पावले पडत आहेत. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहक संघटना व अन्य ग्राहक संघटना नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून राहिले आहे.