संगमेश्वर :- संगमेश्वर-संभाजीनगर येथील बंद घराच्या दरवाजाची कडीकोयंडी तोडून अज्ञाताने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ११ हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना शनिवार ९ मे रोजी दुपारी २ वा. सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अनिता संतोष मोहिते (३६, रा. संभाजीनगर संगमेश्वर, रत्नागिरी) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शनिवारी अनिता मोहिते आपल्या कुटुंबासह चिपळूण येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मुलाच्या मोबाईलवर शेजारी राहणाऱ्या आकाश जाधव याने फोन करुन तुमच्या घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत दिसून येत असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच अनिता मोहिते कुटुंबासह तातडीने चिपळूणहून संगमेश्वरला आल्या. घरी येऊन पाहिल्यावर त्यांना घराची कडीकोयंडी उचकटलेली आढळली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटाच्या लॉकरमधील ६१ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ११ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी तातडीने याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास महिला पोलिस नाईक कोष्टी हे करत आहेत.