अंतर्गत चलबिचल सुरू; नेते देखील धास्तावले
रत्नागिरी:- भाजपचे माजी मंत्री प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी ऐन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राहूल पंडित यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना पेव फुटले. त्यानंतर गेले अनेक दिवस शिवसेनेच्या लेखी दुर्लक्षित असलेले पंडित पुन्हा प्रकाशात आले. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनीही पंडित शिवसेनेत जाणार नाहीत असा विश्वास व्यक्त केला आहे.
थेट नगराध्यक्षपदाच्या पहिल्याच निवडणुकीत उच्चशिक्षिकत आणि पारदर्शी अशा राहूल पंडित यांनी शिवसेनेकडून निवडणुक लढवत विजय संपादित केला होता; मात्र अडिच वर्षानंतर निवडणुकीवेळी दिलेली आश्वासनं पुर्ततेसाठी पंडित यांना नगराध्यक्षपदावरुन राजीनामा द्यावा लागला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या घटनांमुळे राहूल पंडित यांना तिन महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवून नगराध्यक्षपदाचा भार तत्कालीन उपनगराध्यक्ष बंड्या साळवींकडे सोपवण्यात आला. त्यावेळी पंडित यांनी भैरी देवीच्या चरणी राजीनामा पत्र सादर केल्यामुळे शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. यामध्ये शिवसेना बॅकफूटवर जाऊ लागली होती. अनेक विकासकामे रखडल्याचा ठपकाही शिवसेनेवर बसलेला होता. सहा महिन्यानंतर पंडित यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात आला. त्यानंतरच्या पोट निवडणुकीत शिवसेनेचे बंड्या साळवी नगराध्यक्षपदी निवडून आले; परंतु पढील वर्षभरात राहूल पंडित शिवसेनेच्या राजकीय पटलावर कुठेच दिसत नव्हते.
रत्नागिरी शहरातील पाणी प्रश्न, नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम, मोकाट गुरे हे प्रश्न ऐरणीवर आलेले होते; परंतु कोरोना टाळेबंदीमुळे या सर्वच प्रश्नांना बगल दिली गेली. सभागृहात शिवसेनेचे प्राबल्य असल्यामुळे विरोधी पक्षात बसलेले भाजपा दुर्लक्षित होते. गेले सहा महिने शिवसेनेच्या दुर्लक्षित नेत्यांना आपलेसे करण्याच्यादृष्टीने भाजपकडूनही प्रयत्न सुरु होते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी भाजपचे नेते रविंद्र चव्हाण यांनी अचानक राहूल पंडित यांची भेट घेतली. त्यांचे फोटोही सोशल मिडियावर व्हायरले झाले आणि पंडित भाजपवासी होणार अशी चर्चा सुरु झाली. या प्रकारामुळे अनेक शिवसैनिकांना धक्का बसला. नगराध्यक्ष कार्यकालात त्यांच्यावर विकासकामे थांबल्याचा ठपका होता; मात्र पारदर्शक कारभार ही छबी अजुनही कायम आहे. चव्हाण यांच्या भेटीनंतर दुर्लक्षित पंडित हे पुन्हा शिवसेनेच्या पटलावर दिसू लागले. खासदार विनायक राऊत यांनीही राहूल पंडित यांच्याशी संवाद साधत ते शिवसेनेतून जाणार नाहीत अशी ग्वाही दिली.