अवैध बांधकामे; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
रत्नागिरी:- तालुक्यातील वरवडे येथील मेरीटाईमच्या बोर्डाच्या जागेत खासगी बांधकामांना ऊत आला आहे. कोणत्याही खात्याची परवानगी न घेता या जागेत येथील काही स्थानिक पुढाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेत पक्की बांधकाम केली आहेत. शासकीय जागेचा खासगी वापर करूनही शासकीय यंत्रणा मात्र डोळ्यावर पट्टी बांधून असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील वरवडे गाव मासेमारी व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. मागील अनेक वर्षे वरवडे गावातील ग्रामस्थांचा मासेमारी हाच पारंपारिक व्यवसाय राहिला आहे. नैसर्गिक बंदर असल्याने बंदरा शेजारी वस्ती वसली आहे. मात्र ज्या ठिकाणी मासेमारी नौका उभ्या केल्या जातात ती जागा मेरीटाईम बोर्डाच्या अखत्यारीत आहे. या जागेत वर्षानुवर्षे मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना नौका उभ्या करण्यासह जाळी सुकविण्यासाठी मुभा होती. मात्र मागील काही काळात या शासकीय जागेत काही स्थानिक स्वयंघोषित पुढाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.
मेरीटाईम बोर्डाच्या जागेत तीन ते चार अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. यातील काही बांधकामे ही दुमजली आहेत. वयक्तिक वापरासाठी या बांधकामाचा वापर होत असल्याने अनेक वर्षे या ठिकाणी मासेमारी व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांना या अनधिकृत बांधकामाचा मोठा फटका बसला आहे. नौका किनाऱ्यावर घेताना आणि अन्य कामे करताना या अनधिकृत बांधकामांचा त्रास सहन करावा लागत आहे.
वरवडे खाडी किनारी उभ्या राहिलेल्या या अनधिकृत बांधकामा विरोधात ग्रामस्थांमध्ये आणि मच्छिमार यांच्यात प्रचंड नाराजी असून या विरोधात लवकरच तक्रार करण्याची भूमिका मच्छीमारांनी घेतली आहे.