राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेविषयी संदिग्धता; विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा गुणांना मुकण्याची शक्यता

रत्नागिरी:- शासकीय क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंची शालेय वयातच जडणघडण होते. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून दहावी, बारावीच्या परीक्षेत अतिरिक्त क्रीडा गुण मिळतात. पण, यंदा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेविषयी संदिग्धता आहे. त्यामुळे शासकीय क्रीडा स्पर्धा राज्य स्तरापर्यंतच होणार आहेत. परिणामी, शालेय खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा गुणांना मुकण्याची चिन्हे आहेत.

संघटनांतील वादातून स्पर्धेच्या आयोजनास झालेल्या विलंबामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची आवड-निवड वेगवेगळी असते. प्रत्येकजण अभ्यासातच चमकेल असे नाही. कोणाला कलेत तर कोणाला खेळात गती असते. हीच बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांतील क्रीडा गुणांना गुणांना शालेय वयातच वाव मिळावा या उद्देशाने शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या
जातात.

एकूण 92 क्रीडा प्रकारांसाठी स्पर्धा होतात. यात यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेत अतिरिक्त क्रीडा गुण दिले जातात. जिल्हास्तरावर पाच, विभागीय स्तरावर 10. राज्य स्तरावर 15 तर राष्ट्रीय स्तरावर चमकणार्‍यांच्या खात्यात 20 गुणांची कमाई होते. शालेय खेळाडूंसाठी हे गुण महत्त्वपूर्ण ठरतात. मुळात दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्पर्धाच झाल्या नव्हत्या. त्यात यंदाच्या शासकीय शालेय क्रीडा स्पर्धांना संघटनेतील वादाचे ग्रहण लागले आहे. स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेत दोन गट पडले आहेत. परिणामी, स्पर्धा होतील की नाही याबाबतच साशंकता व्यक्त केली जात होती.

दरम्यान, यातच शाळांचे पहिले सत्र निघून गेले आहे. वास्तविक पहिल्या सत्रात स्पर्धा होणे आवश्यक असते.दुसर्‍या सत्रात स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पण, या स्पर्धा राज्य स्तरापर्यंतच होणार असल्याचे कळते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेबाबत अद्याप संदिग्धता आहे. राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा झालीच नाही तर विद्यार्थ्यांना तेथील यशानंतर मिळणार्‍या क्रीडा गुणांना मुकावे लागण्याची शक्यता आहे. सध्याचे चित्र तरी हेच दिसत आहे. संघटनेतील वादामुळे शाळांच्या पहिल्या सत्रात शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा झाल्याच नाहीत. बर्‍याच घडामोडीनंतर आता दुसर्‍या सत्रात स्पर्धांना मुहूर्त मिळाला आहे. तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा प्रथमच शाळांच्या दुसर्‍या सत्रात होत आहेत. याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना एकाच सत्रात शालेय क्रीडा स्पर्धा, शाळांचा क्रीडा महोत्सव, स्नेहसंमेलनाच्या वेळापत्रकातून अभ्यासक्रम सांभाळताना कसरत करावी लागणार आहे.