मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; चिपळुणातील ५ जण जखमी

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील महाडनजीक कारचा टायर फुटून लगतच्या दुभाजकावर आदळल्याने ५ जण जखमी झाले. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारालाही धडक दिल्याने तो देखील जखमी झाला. जखमींना उपचारासाठी तातडीने महाड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

संदीप गणेश चिपळूणकर (४५), अथर्व संदीप चिपळूणकर (१७), सबुरी संदीप चिपळूणकर (७), आतिथ्य चिपळूणकर (७), सतीश चिपळूणकर (१४, सर्व रा. चिपळूण) यांच्यासह राजेंद्र वसंत देशमुख (५७) या दुचाकीस्वाराचा जखमींमध्ये समावेश आहे. अपघातामुळे काही

काळ वाहतूक खोळंबली. चिपळूण येथील संदीप चिपळूणकर हे इर्टिगा कार (एम.एच.०८/ए.जे.८०१९ क्रमांकाची) घेवून चिपळूणहून मुंबईच्या दिशेने जात होते. कारचा टायर अचानक फुटल्याने कारवरील नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली. याचदरम्यान, रस्त्यावरून जात असलेल्या दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघाताचे वृत्त कळताच महाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मदतकार्य केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवल्यानंतर विस्कळीत वाहतूक पूर्ववत झाली. अपघातात इर्टिंगा कारच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा झाला. अपघात नेमका कसा घडला, याचा महाड पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.