दाभोळ: आपल्या आत्महत्येला कुणाला जबाबदार धरू नये, माझ्यापासून तुला खूप त्रास झालेला आहे, सॉरी, मुलाला चांगले सांभाळ, त्याची चांगली काळजी घे, माझ्या अंत्यविधीसाठी माझ्या माहेरच्या नातेवाईकांना बोलवू नकोस, अशी दीड पान चिठ्ठी पूर्वी तुरे यांनी पतीच्या नावे लिहिली होती. माहेरबाबत त्यांना कटुता का होती अन् आत्महत्येचे कारण काय याचे गूढ अद्याप कायम आहे.
दापोली तालुक्यातील मुरुड येथील पोस्ट कार्यालयात कार्यरत असलेल्या पूर्वी तुरे या पोस्टमास्तर महिलेने मुरुड पोस्टातील भालाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली होती. मात्र तुरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी दीड पान चिठ्ठी (सुसाईड नोट) पतीच्या नावे लिहिली होती व ही चिठ्ठी तिने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या पर्समध्ये ठेवली होती. मुरुड येथील पोस्टात काम करणाऱ्या तुरे २६ मार्चला दुपारी अडीचच्या सुमारास तिचा पती सुशील याला आपण दापोली येथील पोस्ट कार्यालयात पैसे देवाणघेवाणीचे मशिन दाखविणेसाठी जात असल्याचे सांगून हणे येथील घरातून बाहेर पडल्या. मात्र सायंकाळ झाली तरी त्या घरी परत न आल्याने त्यांचा शोध सुरू झाला. मुरुड येथील पोस्ट कार्यालयाच्या दरवाजाला आतून कडी लावलेली आढळून आली, त्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता तुरे यांनी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. पूर्वी व सुशील यांचा ४ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाह असल्याने पूर्वी त्या माहेरी जात नव्हत्या.