मच्छीमारांचा डिझेल कोटा रखडला; नाराजीचा सूर

रत्नागिरी:- जिल्ह्यातील हजारो मच्छीमारांचा दोन ते तीन वर्षांचा 52 कोटीचा डिझेल परतावा थकित राहीला आहे. काही दिवसांपुर्वी शासनकडून निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नसल्यामुळे मच्छीमारांमध्ये तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

यंदाच्या हंगामाच्या सुरवातीपासूनच निसर्गाने मच्छीमारांना अडचणीत आणले आहे. गतवर्षी कोरोनामुळे हंगाम वाया गेला होता. यंदा पाऊस लांबल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत वातावरण बिघडलेले होते. सुरवातीला बांगडा, म्हाकुळ देणारी मासळी सापडत होती. पण त्यामधून ना नफा ना तोटा अशीच स्थिती मच्छीमारांची होती. अनेकवेळा मच्छीमारांना रिकाम्या हाती परतावे लागल्यामुळे डिझेल वाया गेले आहे. उत्पन्न न मिळाल्यामुळे मच्छीमारही त्रस्त झाले आहेत. मच्छीमारांना आधार देण्यासाठी डिझेल परतावा मिळतो. शासनाकडून दरवर्षी परताव्यासाठी तरतूद केली जाते; मात्र यंदा कोरोनामुळे पुरसा निधीच नव्हता. काही दिवसांपुर्वी मत्स्य व बंदर मंत्र्यांनी लवकरात लवकर डिझेल परतावा मच्छीमारांना उपलब्ध करुन दिला जाईल असे जाहीर केले होते; मात्र अजुनही अनेक मच्छीमारांच्या खात्यात परतावा जमा झालेला नाही. यापुर्वी परताव्याची रक्कम मच्छीमार सोसायटींकडे जमा होत होती. त्यामधून कर्जापोटीचे हप्ते कापून घेतले जातात. सध्या हंगाम सुरु असला तरीही म्हणावी तशी मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांपुढील अडचणी वाढत आहेत.