रत्नागिरी:- युरोपसह इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी दरवर्षी केली जाते. त्यासाठी यंदा मार्च 2021 पर्यंत अंतिम मुदत असून जास्तीत जास्त बागायतदारांनी नोंदणी करा असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 350 बागांची नोंदणी झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भौगिलिक निर्देशांक (जीआय) प्राप्त हापुस आंबा फळपिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. या पिकाची व्यावसायिक दृष्टीकोनातून लागवड करून तंत्रज्ञानाचा वापर करून निर्यातक्षम दर्जाचे जिल्ह्यात उत्पादन करण्यात येते. युरोपीयन युनियन आणि इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. जिल्हयात 2019-20 मध्ये 4 हजार 350 निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी झालेली आहे. 2020-21 मध्ये निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी करीता मँगोनेट ही ऑनलाईन प्रणाली 1 डिसेंबर 2020 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना नोदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे. निर्यातक्षम बागांच्या ऑनलाईन नोंदणीकरीता अपेडाने फॉर्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅप उपलब्ध केलेला आहे. अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व आंबा बागायतदारांनी 2020-21 करीता नोंदणीसाठी संबंधित कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्या संपर्क साधुन त्वरीत अर्ज करण्यात यावेत. निर्यातक्षम आंबा बागांची एकदा नोंदणी केल्यानंतर ती 5 वर्षासाठी वैध राहील. त्यामुळे गतवर्षी नोंदणी केलेल्या आंबा बागांची नव्याने नोंदणी करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, सातबारा, 8 अ बागेचा नकाशा आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.