भाजपाने रत्नागिरीत उभारली चार कोविड सेंटर; उद्या लोकार्पण सोहळा

रत्नागिरी: कोविड साथरोगाचा संसर्ग वाढला असताना कोकणवासीयांना दिलेला शब्द खरा करत भारतीय जनता पक्षाने रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये १ कोटी ३५ लाख खर्च करून ४ कोविड केंद्रे उभारली आहेेत. याचा लोकार्पण सोहळा ८ सप्टेंबर रोजी होणार आहे. भाजप आणि ‘अंत्योदय प्रतिष्ठान’च्या माध्यमातून उभारलेल्या सुविधांमुळे या दोन्ही जिल्ह्यांमधील आरोग्य सुविधा भक्कम होणार असून त्यामुळे कोविड-१९ च्या काळात नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे आ प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

या कोविड केंद्रांचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे, महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून ते दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित राहणार आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर, माजी खासदार श्री निलेश राणे, माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे, आमदार रमेश पाटील, आमदार भाई गिरकर, आमदार नितेश राणे हे मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी येथील ही केंद्रे आबासाहेब मराठे हायस्कूल हातीवले राजापूर, खंडाळा हायस्कूल रत्नागिरी, महात्मा गांधी विद्यालय साखरपा आणि लोकमान्य टिळक विद्यालय दाभोळ या ठिकाणी होणार आहेत. ही केंद्रे भाजपचे आमदार निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, रमेश पाटील आणि प्रसाद लाड यांच्या आमदार निधीतून उभारली गेली आहेत. त्यांना नीता प्रसाद लाड यांच्या ‘अंत्योदय प्रतिष्ठान’नेही आर्थिक हातभार लावला आहे.  
 

प्रसाद लाड यांनी रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना तीन महिन्यांपूर्वी येथील जनतेला आश्वासन दिले होते. कोविड-१९ रुग्णालये उभारून या जिल्ह्यांच्या विविध भागांमध्ये आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सुधारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्या आश्वासनांची पूर्तता या रुग्णालय आणि कोविड केंद्रांच्या माध्यमातून केली जात आहे.        

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आम्ही रत्नागिरी मध्ये मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उभारणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील काही याधीही दाखल झाल्या असून नवीन रुग्णालय व केंद्रांच्या माध्यमातून पुढील टप्पा या आठवड्यात पूर्ण होत आहे. आणखीही आरोग्य सुविधा आम्ही पुढील टप्प्यात दाखल करणार आहोत. कोविडची तिसरी लाट येवू नये, अशीच प्रार्थना ईश्वरचरणी राहील.पण ती आलीच तर या आरोग्यसुविधा महत्वाची कामगिरी पार पाडणार असल्याचे यावेळी आ. लाड यांनी सांगितले.