पोलिसांकडे तक्रार केली म्हणून पतीने केली पत्नीला मारहाण

रत्नागिरी:- मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याप्रकरणी पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना मंगळवार 17 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वा. सुमारास कुवारबाव येथे घडली.

लखन रामचंद्र चिकोडीकर (रा. कुवारबाव, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नी निलिमा लखन चिकोडीकर (27, रा.कुवारबाव, रत्नागिरी) यांनी बुधवार 18 सप्टेंबर रोजी दुपारी तक्रार दिली आहे. त्यानुसार,17 सप्टेंबर रोजी दुपारी संशयित पती घरी आल्यावर निलिमा चिकोडीकर यांनी पतीला त्याच्या अफेअर बाबत विचारणा केली. याचा राग आल्याने पतीने तिला शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी मारहाण केली होती.

याबाबत तिने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पतीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. आपल्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून पतीने रात्री दारुच्या नशेत घउी येउन पत्नी निलिमाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी आता शहर पोलिस ठाण्यात पती विरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 118(1),352,351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.