रत्नागिरी:- आज नुकत्याच आलेल्या तपासणी अहवालात एकूण 12 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यातील 7 जण थिबा पॅलेस जवळील फार्मसी कॉलेजचे शिक्षक असल्याने एकच खळबळ उडाली आहे. रिपोर्ट येताच आरोग्य यंत्रणा कामाला लागली. काल या सर्वांचे स्वाब घेण्यात आले होते. या 12 जणांना रुग्णालयात आणण्यासाठी आरोग्य पथके बाहेर पडली आणि एक धक्कादायक प्रकार समोर आला. खरं म्हणजे ज्या व्यक्तीचा स्वाब घेण्यात येतो त्या व्यक्तीने रिपोर्ट येईपर्यंत सार्वजनिक ठिकाणी फिरता कमा नये. मात्र आज आलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्ट पैकी एक व्यक्ती एका लग्न समारंभात सामील झाल्याचा प्रकार घरी आणावयास गेलेल्या आरोग्य पथकाच्या निदर्शनास आला.
अनेकवेळा फोन करूनही ही व्यक्ती फोन उचलत नव्हती, शेवटी लग्न ज्या गावात होते त्या गावातील सरपंच आणि पोलीस पाटलाला फोन करून या पॉझिटिव्ह व्यक्तीला लग्न मंडपातून बाहेर काढण्यास सांगितले. अशा बेफिकीरपणे वागणाऱ्या व्यक्तिंमुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे. आता लग्न मंडपातील किती जणांची तपासणी करणार? या माणसामुळे नेमका किती जणांना संसर्ग झालाय याची उत्तरे काही दिवसातच मिळणार आहेत. या प्रकारामुळे तालुक्यातील कासारवेली येथील अनेकांची धाकधूक वाढली आहे.