पावसाची दडी; अनेक भागात भात लावणीची कामे थंडावली

रत्नागिरी:- जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे कातळावरील 20 टक्के क्षेत्रासह अनेक ठिकाणी पाण्याअभावी भात लागवडीची कामे थांबली आहे. शनिवारी हलक्या सरी झाल्या; परंतु लावणीला तेवढ्या पुरेसा नसल्याने मोठ्या पावसाची प्रतिक्षाच करावी लागणार आहे. ही परिस्थिती पुढे आठ दिवस राहीली तर भात नर्सरीतील रोपांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पाणी उपलब्ध असलेल्या भागांमध्ये लावणीच्या कामांना वेग आला आहे.

जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात 67 हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. गेल्या दहा वर्षात आधुनिक पध्दतींचा अवलंब करत शेतकरी कमी क्षेत्रात भात उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत. यंदा 16 मेला तौक्ते चक्रीवादळामुळे सलग चार दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर काही दिवसांनी मोसमी पावसाचे आगमन झाले. पोषक वातावरणामुळे जिल्ह्यात भात पेरण्या वेळत झाल्या. पुढे पंधरा दिवस समाधानकारक पाऊस झाला होता. त्यामुळे रोपांची वाढही चांगली होती. 21 दिवसांची रोपं लागवडीसाठी काढली जातात. पण गेल्या पाच दिवसात पावसाने दडी मारली असून मध्येच एखादी सर पडत आहेत. दिवसा पडणार्‍या कडकडीत उन्हाची भर पडत आहे. पावसाअभावी भात लावण्यांची कामे रखडली आहेत. याचा सर्वाधिक परिणाम कातळावरील लागवडीला होणार आहे. जिल्ह्यात हे क्षेत्र साधारण 20 टक्के म्हणजेच 12 हजार हेक्टर इतके आहे. पाणीच नसल्यामुळे या लावण्या करण्याचे धाडस शेतकरी सध्या तरी करत नाही. जिथे ओढे, नाले यासह विहिरीचे पाणी आहे, तेथे लावण्यांची कामे सुरु झाली आहेत. ते क्षेत्र 10 टक्के पर्यंत आहे. हवामान विभागाकडून 9 जुलैपर्यंत पाऊस अनियमित राहील असा अंदाज वर्तविला आहे. आठ दिवस पाऊस लांबला तर पुर्नलागवडीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यात अजून आठ दिवस कातळावरील भात रोपं तग धरु शकतील.