संगलट : दापोली तालुक्यातील टेटवली मोहल्ला येथील एक 35 वर्षे महिला माझी लाडकी बहीण या शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दापोली तालुक्यातील खुट्टाचा कोंड शाळेमध्ये दाखला आणण्यासाठी जात असताना दुचाकीवरून पडून तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दापोली तालुक्यातील टेेटवली गावातील महिला ‘माझी लाडकी बहीण ‘ या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शाळेचा दाखला आणण्यासाठी टेटवली संगलट रस्त्यावरील खूटाचा कोंड येथे गेली होती या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम झाले आहे मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या रस्त्याच्या मध्यभागी मोरी खचल्याने गाडी खड्यातून उडाली. त्यामुळे संबंधित महिलेंचा तोल जाऊन महिला जागीच पडली आणि ती कोमामध्ये गेली तिला त्वरित उपचार मिळावा म्हणून कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र काल रात्री तिचा मृत्यू झाला.
हा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेतून करण्यात आला आहे. रस्त्यातील मोर्या व्यवस्थित बसवण्यात आल्या नसल्याने त्या ठिकाणी अनेकाची वाहने आपटून अपघात होत आहेत. ठेकेदाराने केलेल्या निष्कृष्ट कामाचा फटका वाहनचालकांसह नागरिकांना बसत असल्याचे टेटवली ग्रामस्थांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.