परप्रांतीय अधिकाऱ्याची ग्राहकाला अपमानास्पद वागणूक ; मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला दणका
रत्नागिरी:- शहरातील जिओच्या कार्यालयातील एका परप्रांतीय अधिकाऱ्याने एका मराठी ग्राहकाला अपमानास्पद वागणूक दिल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीला आला. या प्रकारानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिओच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्याला खडेबोल सुनावले. त्यानंतर अधिकाऱ्याने सर्वांची माफी मागितल्यानंतर या वादावर पडदा पडला.
रत्नागिरी शहरातील जिओच्या कार्यालयातील एका सिंग नामक परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी ग्राहकाशी हुज्जत घातली. त्यांच्यातील वाद विकोपाला गेला असता ‘तुझे जो करना है वो कर, मनसे को बोलो, शिवसेना को बोल, या किसी को भी बोलो,’ अशा भाषेत सुनावले. त्या अधिकाऱ्याच्या या वागणुकीबाबत संबंधित ग्राहकाने मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. मनसेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष रुपेश जाधव आणि मनविसे जिल्हाध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण आणि कार्यकर्ते जिओच्या कार्यालयात धडकले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोलवून घेत मनसे स्टाईलने दणका दिला.
यावेळी जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यावर २४ तासात कारवाई करून माफीनामा देण्याचे कबूल केले. तसेच या परप्रांतीय अधिकाऱ्याने मनसेची जाहीर माफी मागितली आहे. कोणत्याही परप्रांतीयांची मुजोरी खपवून घेणार नाही, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.