तापमानाने रत्नागिरीत गाठला उच्चांक पारा

कमाल तापमान ३८ अंशावर; आंब्याला बसणार फटका

रत्नागिरी:- फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस उन्हाळ्याची चाहूल लागली असून गुरुवार २९ फेब्रुवारीला जिल्ह्यात कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदले गेले. दिवसभर उन्हाच्या झळांनी रत्नागिरीकर कासावीस झाले होते. या उष्म्याचा तडाखा आंबा पिकाला बसण्याची भिती बागायतदारांनी वर्तविली आहे. तसेच पुढील दोन दिवसात हवामान विभागाने पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त केली आहे.

गतवर्षी महाशिवरात्रीच्या दरम्यान म्हणजेच फेबु्रवारीच्या दुसर्‍या पंधरवड्यात उन्हाचा कडाका वाढला होता. यंदा पंधरा दिवस उशिराने उन्हाच्या झळा रत्नागिरीकरांना जाणवू लागल्या आहेत. मागील चार दिवस थंडीचा जोर कमी झाला. त्यामुळे दिवसा उष्माही जाणवू लागला आहे. हवामान विभागाकडील माहितीनुसार बुधवारी (ता. 28) 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. किमान तापमान 18 अंश इतके होते. किमान आणि कमाल तापमानात दुप्पट फरक आहे. त्याचे परिणाम आरोग्यावर अधिक होऊ शकतात. गुरुवारी कमाल तापमान 38 अंशावर पोचले आहे. चोविस तासात 3 अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली आहे. हा बदल ॠतू बदलाचे संकेत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. उन्हाळ्याची चाहूल लागली असून त्याला सामोरे जाण्यासाठी नागरिकांना सज्ज रहावे लागणार आहे. गुरुवारी सकाळपासून उन्हाचा तिव्रता जात होती. दुपारी उष्म्याच्या झळा जाणवल्यामुळे अनेकांनी रस्त्यावर बाहेर पडणे टाळले होते. काहींनी रस्त्याच्या शेजारी असलेल्या थंड पेयांच्या स्टॉलवर गर्दी केली होती. दुचाकीवरून फिरणारे डोक्यावर टोपी, चेहर्‍यावर रुमाल बांधून उन्हापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करत होते. दुपारच्या सुमारास रत्नागिरी शहरात काही ठिकाणी अचानक विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे अंगाची लाही-लाही होेईल अशी स्थिती होती. मार्च महिन्याच्या पहिला आठवडा कडकडीत उन्हाचा जाणार असे वातावरण तयार झालेले आहे. आरोग्य विभागाकडूनही लोकांना काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. दरम्यान, बदलत्या वातावरणाचा परिणाम आंबा उत्पादनावरही होण्याची शक्यता आहे. उन्हाचा जोर असाच राहिला तर छोटी कैरी उन्हामुळे पिवळी होऊन गळून जाईल, तर मोठे फळ भाजेल. यामध्ये बागायतदारांचे मोठे नुकसान होईल.