लम्पी आजाराच्या पार्श्भूमीवर आरोग्य विभागाकडून खबरदारी
रत्नागिरी:- जिल्ह्यात लम्पीने एन्ट्री केल्याने पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला आहे. सध्या विविध उपक्रम हाती घेत लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्याबाहेरून येणार्या जनावरांना (बैल, गाय, म्हैस) नो एन्ट्री केली आहे. तसे आदेश प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यांना दिले आहेत.
राज्यात तसेच देशात लम्पी या जनावरांच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत लाखो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. जिल्ह्यातही याची एन्ट्री झाली आहे. यामुळे प्रशासनाची सध्या धावपळ उडाली आहे. गेल्या आठवडाभरात लागण झालेल्या 5 कि.मी. परिसरात 18,600 गुरांचे तत्काळ लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. तर जिल्ह्यात या आजाराचा शिरकाव झाल्यामुळे याठिकाणी असलेल्या एकूण 2 लाख 76 हजार शेतकर्यांच्या गुरांचे मोफत लसीकरण या महिनाभरात पूर्ण केले जाणार आहे.
खेड तालुक्यातील मांडवे परिसरात एका बैलाला या आजारसद़ृश्य लक्षणे दिसून आलेली होती. त्या आजाराचा अहवाल पशुसंवर्धन विभागाने तपासणीसाठी पुणे येथे पाठविला होता. तो तपासणीचा अहवाल लम्पी पॉझिटिव्ह आढळून आल्याने जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग अधिक सतर्क झाला आहे. त्यामुळे खेडमधील मांडवे पंचकोशीतील 5 कि.मी.च्या परिसरात तातडीने लसीकरण गुरांना करण्याची मोहिम हाती घेण्यात आली. आतापर्यंत मांडवे, तळे, जैतापूरवाडी, कोसंबीवाडी परिसरातील 18 हजार 600 गुरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागामार्फत सांगण्यात आले.
जि. प. पशुसंवर्धन विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आता जिल्हा परिषदेचे 73 व स्टेटचे 80 असे एकूण 157 पशु दवाखान्यांच्या अखत्यारित यंत्रणेमार्फत लागोलाग कार्यवाही हाती घेण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिह्यात पहिल्या व दुसर्या टप्प्यात आतापर्यंत 85 हजार लसींचे डोस गुरांसाठी पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध झालेले आहेत. जिल्ह्यात एकूण 2 लाख 76 हजार शेतकर्यांकडे पाळीव गुरे असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या सर्व पाळीव गुरांना लम्पीस्कीनच्या पार्श्वभूमीवर मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. या रोगाबाबत सद़ृश लक्षणे आढळून आल्यास त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
या रोगामध्ये जनावरांचा ताप येतो. शरीरावर 10 ते 15 मि.मी. व्यासाचा कडक गाठी येणे, नाकातून-डोळ्यातून रक्तस्राव होतो. भूक कमी होते, दुध उत्पादन कमी येते, पुढील पायात सूज येते, लंगडणे अशी लक्षणे दिसतात. बाधित जनावरे दोन ते तीन आठवड्यात उपचार होताच बरी होतात. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी बाधित जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवावीत. गोठ्यातील गोचडींचा औषध फवारून बंदोबस्त करावा. परिसर कीटकनाशक औषधे फवारावीत. जनावरांचा बाजार भरवण्यात येऊ नये. आजारावरील लस नजीकच्या पशुसंधर्वन दवाखान्यात संपर्क साधून टोचून घेण्यात यावी. या रोगाबाबत सद़ृश लक्षणे आढळून आल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय तसेच पंचायत समितीमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
पशुपालक शेतकरी परजिल्ह्यातून संकरीत तसेच चांगल्या जातीच्या जनावरे येऊन येत असतात. पण राज्यातील लम्पीस्किनच्या वाढत्या प्रसारामुळे रत्नागिरी जिल्ह्यात परजिल्ह्यातून आणल्या जाणार्या गायी, म्हशींना बंदी पशुसंवर्धन विभागाने घातलेली आहे. परजिल्ह्यातून अशा जनावरांची जर जिल्ह्यात वाहतूक होत असेल तर जिल्ह्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यांवर तत्काळ चौकशी केली जावी, असे निर्देश जिल्हा प्रशासन व पोलीस विभागामार्फत देण्यात आलेले असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली.