जिल्ह्यातील दिव्यांग प्रमाणपत्र धारक ८ जणांची पडताळणी

रत्नागिरी:- बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार घेऊन आयएएस सेवेत समाविष्ट झाल्याचा आरोप पूजा खेडकर या तरुणीवर झाल्यानंतर आता अशी प्रमाणपत्रं धारण करणाऱ्या व २०२३ नंतर सेवेत आलेल्या ३५९ लोकांची पडताळणी करावी, असे आदेश दिव्यांग कल्याण आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पडताळणीस पात्र असलेले आठ उमेदवार असून पडताळणीची कार्यवाही सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.

२०२३ नंतर राज्य सरकारच्या सेवेत आलेल्या ३५९ दिव्यांग उमेदवारांच्या पत्रांची पडताळणी करावी, असे दिव्यांग कल्याण आयुक्तांनी ठरवले. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले. सांगलीत ५, कोल्हापुरात ८, साताऱ्यात १२ तर रत्नागिरी जिल्ह्यात ८ उमेदवारांचे प्रमाणपत्रे पडताळणीस पात्र ठरवण्यात आली. प्रमाणपत्र पडताळणीसाठी ही प्रकरणे संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठवण्यात आली. अद्याप त्याचा अहवाल हाती आलेला नाही. रत्नागिरीतील ८ पडताळणी पात्र उमेदवार तलाठी भरतीमध्ये पात्र ठरले होते. पडताळणीनंतर गैर बाब आढळल्यास दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे धोरण ठरवण्यात आले आहे. पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्य व केंद्र सरकारने हा कार्यक्रम हाती घेतला आहे.