रत्नागिरी:- कुर्ला-मुंबई येथून घरात कुणालाही न सांगता कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना रेल्वेच्या सुरक्षा बल पोलिसांनी चिपळूण येथे ताब्यात घेतले. त्या मुलींना चाईल्ड हेल्प लाईन रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ८) रात्री चिपळूण रेल्वेस्टेशन येथे निदर्शनास आली.
रेल्वेने प्रवास करणाऱे प्रवासी साई संदेश सकपाळ (रा. चिपळूण) याने या मुलींची माहिती रेल्वे सुरक्षा बलच्या पोलिसांना दिली. रेल्वे पोलिसांनी चौकशी करुन त्या अल्पवयीन मुलींना रत्नागिरीत आणले. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्या दोन मुलींना येथील चाईल्ड हेल्प लाईन रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले आहे. अल्पवयीन मुली घरातून न सांगता का आल्या याची माहिती मिळू शकली नाही.