पुण्यातील राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
गुहागर:- गुहागर आगारातून सुटणाऱ्या गुहागर-स्वारगेट बसचे चालक आणि वाहकाला पुणे जिल्ह्यातील खेड, शिवापूर टोलनाक्यावर तिघांकडून जबर मारहाण झाल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याप्रकरणी – पुण्यातील राजगड पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
गुहागर आगारातून १९ रोजी सकाळी ९.१५ वाजता गुहागर- स्वारगेट ही बस घेऊन चालक वे प्रवीण भगवान नांगरे (३४) आणि वाहक एस. एन. कल्लुरकर गेले होते. बसमध्ये ४५ प्रवासी प्रवास करत होते. बस चिपळूण, पाटण, उंब्रज, सातारामार्गे पुणे असा प्रवास करत असताना बस खेड-शिवापूर गावाच्या हद्दीतील टोलनाक्याजवळ आली. तेथे एका ट्रकने कंट मारला. हा ट्रक हा टोल पास करून पुढे वजनकाट्यावर थांबला असता चालक प्रवीण नांगरे यांनी ट्रकचालकाला याचा जाब विचारला. बसमध्ये प्रवासी असून त्यांना कमी जास्त झाल्यास कोण जबाबदार, असे विचारले असता टोलनाक्यावरील निळा टी-शर्ट घातलेला मुलगा पुढे येऊन तू तरी कुठे एसटी नीट चालवतोस, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करून हाताने मारहाण सुरू केली. या एसटी ड्रायव्हरांना लय माज असतो, असे म्हणून शिवीगाळ करीत आपले नाव विशाल जाधव असे त्याने सांगितले. त्याच्याबरोबर आणखी दोन व्यक्तींनी ‘काय झाले, काय झाले’ असे म्हणत चालक प्रवीण नांगरे यांना जबरे मारहाण सुरू केली. या घटनेवेळी वाहकालाही मारहाण केली गेली.
मारहाणीत चालकाच्या पायाला, बरगडीला जबर मार बसला. तोंडातून रक्त येत होते. अशा अवस्थेत प्रसंगावधान राखून वाहकाने एसटी चालवत स्वारगेटपर्यंत आणली. त्यानंतर चालक नांगरे व वाहक कल्लुरकर या दोघांवर तेथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. रात्री उशिरा तेथील राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी संशयित विशाल जाधव व अन्य दोघांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत १३२, १२१ (१), ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक प्रवीण नांगरे यांना उपचार करून घर पाठवण्यात आले, तर वाहक एस. एन. कल्लुरकर हे उपचार घेऊन गुहागर आगारात सेवेवर हजर झाले आहेत.